म्हसुल दिनी जिल्हाधिकारी डॉ . सचिन ओम्बासे यांच्या हस्ते खोंदे , मंडलिक , हारकर , दराडे , कांबळे , माळी , रनशिंगे उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानित
देशभक्त प्रतिनीधी - कळंब
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या हस्ते महसूल दिनाच्या औचित्य साधून प्रशासनात उत्कृष्ट सेवा बजावलेल्या अधिका-यांसह कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गुण गौरव कळंब येथे करण्यात आला. या पुरस्कारामध्ये 'उत्कृष्ट नायब तहसीलदार' म्हणून मुस्तफा खोंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. खोंदे यांनी कळंब येथे महसूल प्रशासनात रूजू झाल्यापासून सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे दिसून येते. तसेच कळंब येथील प्रभारी तहसीलदार म्हणून सहा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ उल्लेखनीय ठरला आहे. पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात येणा-या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी तळमळीने काम केले असल्याचे सांगितले जाते. तसेच विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध प्रकारचे दाखलेही वेळेत देण्याचे विशेष कार्य त्यांनी केले असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांसह पालकांतून ऐकण्यास मिळतात. उत्कृष्ट महसूल सहाय्यक' म्हणून उपविभागीय महसूल कार्यालयातील दिनेश मंडलिक यांना पुरस्कार मिळाला आहे. मंडलिक यांना उस्मानाबाद येथील सेवेत कार्यरत असतानाही उत्कृष्ट शिपाई म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. महसूल उपविभागातील सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विविध दाखले वेळेत एसडीएमकडे पाठविण्याचे काम त्यांनी केले आहे. तसेच गेल्या महिन्यात ऑनलाईन प्रक्रिया बंद पडल्याने विद्यार्थ्यांना ऑफलाईन दाखले देण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य करण्याचे कामही मंडलिक यांनी केले असल्याचे नागरीकांतून सांगितले जाते. उत्कृष्ट महसूल मंडळाधिकारी म्हणून श्रीमती प्रणिता दराडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट शिपाई म्हणून आबा रणशिंगे यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कामात सतत तत्पर आसणा-या आबांनी कामाच्या माध्यमातून महसूल प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्कृष्ट अव्वल कारकून म्हणून यशवंत हारकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कोतवाल म्हणून सुनील माळी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुनील माळी हे महसूल प्रशासनातील टपालचे काम चोखपणे बजावत असल्याचे दिसून येते. तर उत्कृष्ट तलाठी म्हणून कांबळे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या काळानुसार स्वता:मध्ये जबाबदारी नुसार बदल केले पाहिजेत. प्रशासनात आपली भूमिका नेहमी प्रशासक, समन्वयक आणि नियंत्रक राहिली पाहिजे. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अमिषाला न बळी पडता, आपल्याला मिळत असलेल्या वेतनात समाधानी राहून जनतेची सेवा करावी. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच महसूल विभागाची विकास कामांमध्ये महत्वपूर्ण भुमिका आहे. ही जबाबदारी ओळखून ती यशस्वीरित्या पार पाडावी. विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत सहज व सुलभ पोहोचविण्यासाठी कामाप्रती सकारत्मक दृष्टीकोण विकसित करावा. असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस उप अधीक्षक एम.रमेश, सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडळकर, अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेद्रकुमार कांबळे, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोरे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, भूमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील, विशेष भूसंपादन अधिकारी राजकुमार माने, विशेष भूसंपादन अधिकारी मांजरा प्रकल्प उदयसिंह भोसले, कळंबच्या तहसीलदार मनिषा मेने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, तसेच सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या मुला मुलींना चांगले शिक्षण द्या, पाल्यांचे उच्च शिक्षण ही आपली खरी कमाई असते येणाऱ्या पिढीला उत्तम प्रशासन आणि पारदर्शक सेवा देणे हा त्यांच्या भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी महत्वाची बाब ठरेल. त्यामुळे महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढच्या पिढीचा विचार करून काम करावे, असेही आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी केले. सुत्रसंचालन वृषाली तेलोरे यांनी आणि आभार तहसीलदार मनिषा मेने यानी मानले.
तत्पूर्वी यावेळी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोमान्य बालगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.




