बसवराज मंगरुळेंच्या घरी पंकजा मुंडेंची भेट लोकसभेवरही चर्चा
देशभक्त न्युज - उस्मानाबाद / -
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू आहे. गाणगापूर येतील दत्त मंदिरात दर्शन घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. भाजपा पदाधिकारी
व कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताला मोठी गर्दी केली होती. येथील मुरूम गावात भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडेंनी चहापान घेतले. त्यावेळी, लोकसभा निवडणुकांवर चर्चा झाल्याची माहिती आहे, त्यामुळे पुन्हा एकदा बसवराज मंगरुळेंची चर्चा जोर धरू लागली आहे. पंकजा मुंडे यांनी मंगरुळेंचा पाहुणचार करुनच दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी, उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यातील भाजपा पदाधिकारीही घरी जमले होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच, बसवराज मंगरुळे यांचा जनसंपर्क आणि त्यांच्या दौऱ्याबद्दलचाही आढावा पंकजा मुंडेंनी घेतला. स्व. गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून मंगरुळे यांची मराठवाड्यात ओळख आहे. त्यामुळेच, पंकजा यांच्यासोबतची चर्चा राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरतेय. शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडे आपली राजकीय ताकद आजमावत आहेत. तर, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात बसवराज मंगरुळे हेही चांगलेच सक्रीय झाले आहेत. प्रत्येक तालुक्यात ते पायाला भिंगरी लावल्यागत फिरत आहेत. म्हणूनच, आगामी निवडणुकांमध्ये मंगरुळेंचा रोल काय, याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय.
