श्री येडेश्वरी देवस्थानाचा परिपूर्ण विकास आराखडा तयार होणार
देशभक्त न्युज - येरमाळा प्रतिनिधी / -
आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी देशभरातून दरवर्षी लाखो भावी येत असतात. या भाविकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासह एक उत्तम धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने परिसराचा परिपूर्ण विकास आराखडा तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली.
आई येडेश्वरी देवस्थानासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून ४ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पालखी मार्ग व विद्युतीकरणाची कामे प्राधान्याने घेण्याची सूचना देण्यात आली. आराखड्यामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबींसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून पुजारी, मंदिर विश्वस्त, भाविक व ग्रामस्थांच्या सूचना जाणून घेण्याचे ठरले आहे. सदरील समितीला १० दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
मंदिरालगतची वन विभागाची जमीन मंदिर संस्थानाला हस्तांतरित करून त्या बदल्यात मंदिर संस्थाची जागा व आवश्यक रक्कम वन विभागाला देण्यास तयार असल्याचे मंदिर विश्वस्त समाधान बेद्रे यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी यांनी सविस्तर प्रस्ताव दाखल करण्याची सूचना केली आहे. आपण यासाठी आवश्यक रकमेचा समावेश मास्टर प्लॅनमध्ये करणार असल्याचे सूचना केली आहे.
यात्रा कालावधीत १५ ते २० लाख भाविक येत असल्याने यात्रा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. मात्र ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन नसल्याने कायमस्वरूपी यात्रा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी पंचायत समितीचे माजी सभापती विकास बारकुल यांनी बैठकी मध्ये केली. तसेच यात्रेच्या अनुषंगाने आवश्यक महावितरणाच्या कामासाठी निधी देण्याची विनंती देखील करण्यात आली.
इतर देवस्थानाच्या धर्तीवर यात्रा अनुदान मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याच्या तथा भाविकांसाठी शौचालय व पिण्याच्या स्वच्छ पाण्याचे नियोजन करण्यासाठी जागा निर्धारित करण्याची सूचना उपविभागीय अधिकारी यांना दिली. तसेच महावितरणच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे.
याप्रसंगी सदरील बैठकीस उपविभगीय अधिकारी संतोष पाटील, तहसीलदार पांडे, गट विकास अधिकारी चकोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुंडे, वन विभागाचे पौळ, सरपंच सुजाताताई श्रीकांत देशमुख, उपसरपंच गणेश बारकुल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मदन बारकुल, ग्रामपंचायत सदस्य तानाजी सवने, विलास बारकुल, दशरथ जाधव, विशाल बारकुल, तब्बस्सुम सय्यद, येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बापू बेद्रे, विश्वस्त संजय आगलावे, समाधान बेद्रे, गणेश बेद्रे व अधिकारी उपस्थित होते .
