छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळविणाऱ्या सरकारला जनता कोसविळणार - ठाकरे
धाराशिव जिल्ह्याला कलंक न लागू देणाऱ्या कैलास पाटील यांना आशिर्वाद द्यावेत
सभेसाठी तुफान गर्दी
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. भाजप व महाविकास आघाडीची मंडळी बाहेर येत आहेत. त्यांना बहिणींवर खरोखरच प्रेम व काळजी असती तर सरकारमध्ये बसता क्षणीच महिलांना दीड हजार रुपये सुरू केले असते. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप व महायुतीच्या पेकाटात लाथ घातल्यामुळे त्यांनी या निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्यात येतील. महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कामामध्ये भ्रष्टाचार करून तो पुतळा कोसळविला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळविणाऱ्या सरकारला जनता कोसविळणार असा प्रहार माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दि.१२ नोव्हेंबर रोजी केला. दरम्यान मोदी व शिंदे सरकारच्या कारभारार जबरदस्त हल्लाबोल केला.
धाराशिव येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर माहितीचे उमेदवार आमदार कैलास पाटील (धाराशिव), धीरज पाटील (तुळजापूर) व माजी आमदार राहुल मोटे (परंडा) यांच्या संयुक्त प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, काँग्रेसचे विश्वास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, डॉ प्रतापसिंह पाटील, संजय निंबाळकर, धनंजय शिंगाडे, विशाल शिंगाडे, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, शहर प्रमुख सोमनाथ गुरव ,अक्षय ढोबळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, धाराशिवकारांनी आपली निष्ठा ढळू दिली नाही, त्याबद्दल मला दंडवत घालावासा वाटतो. परंतू माझी शस्त्रक्रिया झाल्यामुळे मला वाकता येत नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच आमदार कैलास पाटील यांनी अमिषाला व खोक्याला बळी न पडता सोन्याच्या लंकेपर्यंत जाऊन तिथून परत आले. कारण त्यांना माहित होते की शिवसेनेची मशाल सोन्याची लंका जळणार आहे. विशेष म्हणजे भाजपने मला संपवण्यासाठी प्रयत्न केले व करत आहेत. मात्र जनता म्हणजेच तुम्ही माझ्या पाठीशी असल्यामुळे मोदी, शहा मला संपवू शकत नसल्याचे सांगत मोदी शहा यांच्यावर खास ठाकरे शैलीत निशाणा साधला. महाविकास आघाडीचा आम्ही वचननामा प्रसिद्ध केला आहे. तर महायुतीने जुमला नामा प्रसिद्ध केला असल्याची तोफ त्यांनी डागली. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त ७ मंत्री मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये कर्ज माफ करण्याची घोषणा केली नाही. ती प्रत्यक्षात अमलात आणली. तसेच १० रुपयांमध्ये शिव भोजन थाळी सुरू केली. तर मोदी म्हणाले होते की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, १५ लाख रुपये खात्यात जमा केले जातील असे आश्वासन दिले होते. मात्र त्यापैकी त्यांनी काहीही केले नसल्याचा घनाघात करीत त्यांच्यावर हल्ला चढविला. कश्मीरमधील ३७० कलम हटविले, त्याचा सर्वसामान्यांना फायदा होईल असे वाटले होते. मात्र सर्वात जास्त फायदा अदानीला झाला असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ८ ते १० हजार रुपये प्रती क्विंटलला भाव होता. तुमच्या काळात सोयाबीनला साडेतीन ते चार हजार रुपये भाव आहे. तुम्ही गद्दाराला ५० खोटी देता. शेतकरी राबराब राबतो त्याच्या कष्टाला किंमत न देता सोयाबीन पेक्षा कचऱ्याला अधिक किंमत देत असल्याचा निशाणा त्यांनी साधला. आमच्या काळामध्ये आम्ही सोयाबीन व दुधाला भाव दिला होता. त्यामुळे आमचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासह शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणार व जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव शेतकऱ्यांचे एक रुपयाचे देखील नुकसान न करता स्थिर ठेवणार, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणार, अंगणवाडी कार्यकर्ती व आशा स्वयंसेविका यांचे मानधन वाढविणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच औसाहून उमरग्याला येताना माझे हेलिकॉप्टर उडान करू दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सोलापूरच्या विमानतळावर उतरले असताना मुद्दाम मला इतर कार्यक्रमास जाण्यास विलंब व्हावा यासाठी हा खोडसाळपणा केल्याचा आरोप त्यांनी केला. ३७० कलम रद्द करण्यासाठी मी तुमच्यासोबत होतो. मात्र तुम्ही दिलेले वचन न पाळल्यामुळे मी काँग्रेस सोबत गेलो तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळफळाट होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मुस्लिम शिवसैनिक गेल्या २५-३० वर्षांपासून काम करीत आहेत. त्यावेळी त्यांची मते तुम्हाला चालत होती. आता ते आम्हाला मत करीत असताना तुम्हाला वोट जिहाद कसा आठवतो ? असा थेट सवाल त्यांनी विचारला. शिवसेनेचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटणार आहे. तर तुम्हाला चूल पेटविता येत नसल्यामुळे तुम्ही थेट घर पेटवण्याचे काम करून आपली पोळी भाजत असल्याचे सांगत तुमचे हिंदुत्व घर पेटवणारे असल्याचा हल्लाबोल त्यांनी चढविला. आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक मंत्री असताना त्यांनी देश विरोधी कारवाया केल्या म्हणून आमच्याकडे ठोस पुरावे आहेत असे सांगत मलिक यांना अटक केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रष्टाचार केला असे सांगून त्यांच्यावर कारवाई करण्याचे नाटक केले. मात्र पाचव्या दिवशी त्यांना सरकारमध्ये सामील घेतले, त्याच दिवशी नाव मलिक तुरुंगाच्या बाहेर आले. नवाबमलिक यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस जाणार का असा सवाल करीत फडणवीस यांनी वैचारिक गुंता केला असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचा वैचारिक गुंता पुन्हा आम्हाला सोडवावा लागेल असे सांगत फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. महाविकास आघाडी महाराष्ट्र वाचविण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान व अभिमान जपण्यासाठी मैदानात उतरली आहे. तर महायुती गुजरातला महाराष्ट्र वाहून नेण्यासाठी निवडणूक लढवीत असल्याचा प्रहार त्यांनी केला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीला तुमची साथ हवी असून तुम्ही साथ द्यावी असे आवाहन ठाकरे यांनी उपस्थितांना केले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम बदलून दुधाळवाडी साठवण तलाव व रामदारा तलावाचा समावेश करून त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद केली होती. तर जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या पाटबंधाऱ्यावर बॅरेजेस बसविण्यासाठी आराखडा तयार केला होता. मात्र महायुती सरकारने त्या सर्व कामांना स्थगिती दिली. त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही सर्व कामे प्राधान्याने केली जातील असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच लाडक्या बहिणींना दीड हजार ऐवजी ३ हजार रुपये देण्यात येतील व महिलांना मोफत एसटी प्रवास देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आमदार कैलास पाटील म्हणाले की, शहरातील रस्ते व इतर कामासाठी निधी मंजूर असताना या सरकारने सर्व कामांना स्थगिती दिली. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयाने स्थगिती उठवली मात्र त्यांचे आदेश या सरकारने जो मानले नाहीत. शेतकऱ्यांचा पिक विमा रखडविण्यासह पीक नुकसानीचे अनुदान देण्यास देखील या सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी धनंजय शिंगाडे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतीय संविधानाची प्रत देऊन ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. तर मुस्लिम समाजाच्यावतीने देखील ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला.
प्रशांत चेडे, मुंदडा यांच्यासह अनेकांचा सेनेत प्रवेश
यावेळी वाशी येथील शिंदे सेनेचे प्रशांत चेडे, कळंब येथील संजय मुंदडा, धाराशिव येथील मुंडे यांच्यासह अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे



