उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात पोलीस ठाणे अंतर्गत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमदार स्वामी म्हणाले की गणेश मंडळांनी सामाजिक विधायक उपक्रम राबवावेत .
देशभक्त न्युज - उमरगा प्रतिनिधी / -
तालुका पूर्वीपासून शांतता प्रिय आहे. सर्व समाज बांधव एकोप्याने राहतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात शांततेची परंपरा कायम ठेवावी व गणेश मंडळांनी सामाजिक विधायक उपक्रम राबविण्यात यावेत असे आवाहन आमदार प्रवीण स्वामी यांनी दि.१३ ऑगस्ट रोजी केले.
उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात पोलीस ठाणे अंतर्गत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, शिवसेनेचे डॉ अजिंक्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार स्वामी म्हणाले की, सण उत्सव याच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस व प्रशासनाला गणेश मंडळासह जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे. सामाजिक उपक्रम राबविणारा हा तालुका म्हणून वेगळी ओळख आहे. डॉल्बीमुक्त संकल्पना ही सध्या काळाची गरज आहे. सामाजिक उपक्रम राबविणार्या मंडळांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. गणेश मंडळाने सामाजिक उपक्रम राबवून जनहिताचे कामे हाती घ्यावीत. याशिवाय जुगार दारू यापासून दूर रहावे. ग्रामीण भागात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविले जात असले तरी यासाठी पोलिसांनी प्रोत्साहन देऊन ही संकल्पना प्रभावी करावी. महावितरणने गणेशोत्सवा पुर्वी विजपुरवठ्याची कामे पुर्ण करावी, शहरात अनेक ठिकाणी खड्डे दिसत आहेत. नगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सवा पूर्वी हे खड्डे बुजून घ्यावेत. अन्यथा खड्ड्यांचा पंचनामा करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता औदुंबर मोरे, नायब तहसिलदार प्रवीण कावरे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक प्रसाद माळी, सतीश जाधव, सुधाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी आर तायवडे, पी के कनेरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेशंकर पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार प्रशांत पाटील यांनी मानले. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार म्हणाले की, गणेश मंडळांनी वर्गणीसाठी हट्ट करू नये, याबाबत एखादी तक्रार आली तर संबंधित गणेश मंडळावर कारवाई करण्यात येईल. गणेश मंडळांनी मूर्तीच्या ठिकाणी स्वयंसेवकाची नियुक्ती करावी, जेणेकरून एखादा अनुचित प्रकार घडणार नाही. तर पोलीस निरीक्षक सूर्यवंशी म्हणाले की गणेश मंडळाच्या युवकांनी जुगार व व्यसनापासून दूर राहावे आणि पोलिसांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

