विमा नुकसान भरपाई रक्कम देण्यास बँकेकडुन शेतकऱ्यांची अडवणूक - शेतकरी प्रशांत लोमटेचा उपोषणाचा इशारा
देशभक्त न्युज कळंब -
सातत्याने पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला असुन या विमा नुकसान भरपाईची शेतकर्यांना आलेली रक्कम खाते 'लॉक' करून बँक त्यांची अडवणूक करीत असल्याबद्दल शेतकरी प्रशांत लोमटे यांनी उपविभागिय अधिकारी कळंब यांना लेखी निवेदनाद्वारे दि ७ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे . दिलेल्या निवेदनात लोमटे यांनी असे म्हटले आहे की, कळंब तालुक्यातील शेतकरी मागच्या अनेक वर्षापासून संकटाना तोंड देत आहेत. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ त्यांच्या नशिबी मांडलेला असतो. हे कमी की काय म्हणून विलंबाने येणारा पाऊस, विलंबाने होणार्या पेरण्या, बीज उगवणक्षमतेचा प्रश्न, पुढं विसंगत व अनियमित पावसाने वाढीवर व उत्पन्नावर होणारा परिणाम, पावसाचा खंड व अतिवृष्टी, गोगलगाय, यलो मोझॅक, खोडकीड, काढणी पश्चात नुकसान अशा असंख्य संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातूनच या भागात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर गतवर्षी सातत्यानं झालेल्या पावसाने नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मदत देण्यात येत आहे. शिवाय काही विमा रक्कमाही खात्यावर जमा होत आहे. यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः न्यायालयात दाद मागितली होती. अनेकदा संघर्ष करावा लागला होता. मोठा पाठपुरावा करून या मदती शेतकर्यांच्या पदरात पडत आहेत .असे असताना मनमानी कारभार करणार्या कळंब तालुक्यातील काही राष्ट्रीयकृत, ग्रामीण बँकांनी शेतकर्यांना आधार देण्यासाठी बँक खात्यावर जमा केलेल्या रक्कमा खाते लॉक करून अडवून टाकल्या आहेत. यामुळे अडचणीच्या काळात शासनाने दिलेली मदत नियमबाह्यरित्या बँकाकडुन अडकून केली जात आहे .यामुळे मी खालील मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब याठिकाणी दिनांक १५ ऑगस्ट रोजी शेतकर्यांसह त्यांच्या विविध मागण्या संदर्भात अमरण उपोषण करणार आहे. यामधील प्रमुख मागण्या सातत्याने पाऊस, विमा नुकसान भरपाईच्या रक्कमा तात्काळ शेतकर्यांना अदा कराव्यात. शेतकर्यांची त्यांना लॉक केलेली खाती 'अनलॉक' करावीत .सर्व बँक शाखांत शेतकर्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी. कॅबीनच्या दारात असह्यपणे उभा करू नये. जवळपास चाळीस टक्के शेतकर्यांच्या याद्या तलाठी यांनी सादर केलेल्या नाहीत. त्या तात्काळ सादर कराव्यात.पीएम किसानसाठी हेलपाटे मागणार्या शेतकर्यांच्या समस्यांच्या तात्काळ निपटारा करावा.
वरील मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी दिनांक १५ ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. अशा विविध मागण्या संदर्भात लोमटे यांनी निवेदन देवून याच्या प्रति मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य , कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य , विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर , आ. राणाजगजितसिंह पाटील ,जिल्हाधिकारी, धाराशीव ,तहसिलदार कळंब ,पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन कळंब यांना सदर निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत .
