Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वाशी तहसिल कार्यालयावर जाणीव संघटनेचा धडक मोर्चा

वाशी तहसिल कार्यालयावर जाणीव संघटनेचा धडक मोर्चा



देशभक्त न्युज वाशी प्रतिनीधी / -

जाणीव संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृद्ध,निराधार, शेतकरी, शेतमजूर ,गायधारक ,एकल महिला, दुष्काळ या प्रश्नावर जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली पारा चौकातून छत्रपती शिवाजी नगर मार्गे वाजत गाजत घोषणा देत वाशी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी श्रावण क्षीरसागर, मधुकर गायकवाड , जाणीव संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध महिला पुरुषांनी आमची पेन्शन द्या, रखडलेले पैसे द्या, म्हणून मागणी केली. यानंतर तहसील चे पेशकार जे जे तवले यांनी निवेदन स्वीकारले व आमच्या कक्षेतील मागण्या पूर्ण करू व वरिष्ठाकडे पाठपुरावा करू असे सांगितले. यावेळी संघटनेच्या वतीने मागण्या चे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र शासनाने वाशी तालुका दुष्काळी जाहीर करून कुठलिही अंमलबजावणी केली नाही ती तात्काळ करावी , जनावराला दावणीला चारा पिण्याचे पाणी दुष्काळी उपाययोजना यावर तात्काळ अमलबजावणी करण्यात यावी, वाशी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना पेन्शन वाटपात २०२२ पासून तफावत असून सातत्याने सर्वांनी श्रावणबाळ सेवा योजना अर्ज भरून देखील कोणाला तेराशे तर कोणाला पंधराशे दरमहा वाटप करून लाभधारकांमध्ये भेदभाव केला जातो व काहींना केंद्राचा वाटा येऊन देखील पेन्शन दिली जात नाही,चालू पेन्शन बंद केली जाते या सावळ्या गोंधळाची सकल चौकशी होऊन सर्वांना समान पेन्शन वाटप करण्यात यावी, वाशी तालुक्यात १९८५ पासून १८ गावातून दलित, आदिवासी, पारधी यांनी शासकीय पड गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पिके काढून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत या संबंधित अतिक्रमित धारकांच्या नावे सातबारा करण्यात यावा, यासाठी सातत्याने निवेदने धरणे आंदोलने करून देखील कसलीही कारवाई होत नाही, तरी वस्तुस्थितीची पाहणी करून तात्काळ जमीनी नावावर कराव्यात, एकल महिला, विधवा,परितक्त्या, आर्थिक दुर्बल, गोरगरीब यांना पेन्शन मंजुरीसाठी २१ हजाराचे वार्षिक उत्पन्न अट रद्द करून ती ५१ हजार रुपये लागू करावी, व सर्व गरिबांना पेन्शनचा लाभ देण्यात यावा, वाशी तालुक्यातील मागासवर्गीय दलित, पारधी यांना गावोगावी स्मशानभूमी देण्यात यावी, असलेल्या स्मशानभूमी नावावर करून ताबा देण्यात यावा, विभक्त कुटुंबांना शिधापत्रिकेची फोड करून नवीन शिधापत्रिका वाटप करण्यात याव्यात, व सर्वांना धान्यांचा लाभ देण्यात यावा, वाशी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, सरमकुंडी येथे शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटवून गावकऱ्यांना पिण्याचे पाण्याची सोय करावी, दसमेगाव येथे पारधी वस्ती व गावासाठी पिण्याच्या पाण्याची तात्काळ सोय करावी,अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी मधुकर गायकवाड, भीमराव पवार,भिकाजी गरड,पंढरी मुळे,किरण लगाडे,सीमा लगाडे, सोमनाथ लगाडे, रत्नदीप गाडे, दयानंद कदम, पोपट धुमाळ,अंजना गायकवाड, आशाबाई गायकवाड, यांच्या सह यावेळी मोर्च्यात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.