मी मुख्यमंत्री झालो तेंव्हा मला ऐवढा आनंद झाला नाही तेवढा अनंद आज मला माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील अनंद पाहुन वाटतोय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरूच राहणार• लाडक्या बहिणींना ३० सप्टेंबरपर्यंत नाव नोंदविता येणार
• शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध
देशभक्त न्युज - परंडा ( फारुक शेख )
मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे.त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.परंडा येथे दि . १४ सप्टेंबर रोजी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध
शेतकऱ्यांसाठीही राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरु करून देशात पहिल्यांदाच राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.यासोबतच शेतकऱ्यांना केवळ एक रुपये विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ दिला असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील किमान निर्यात शुल्क रद्द करण्याचा आणि खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला दर मिळण्यास मदत होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले.
उजनी धरणातून सीना-कोळेगाव प्रकल्पात पाणी आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी येत्या पंधरा दिवसात बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पालकमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून गेल्या तीस वर्षांपासून प्रतीक्षा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गेल्या दोन वर्षात नागरिकांना पुरविण्यात आलेल्या आरोग्य सुविधांचा लेखाजोखा मांडला. गतवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वारकऱ्यांना पुरविलेल्या आरोग्य सुविधांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. याशिवाय आरोग्य विभागाने राबविलेल्या माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि जागरूक पालक सुरक्षित बालक या अभियानांमुळे राज्यातील मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील १२ कोटी ६५ लाखापेक्षा अधिक नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून जवळपास साडेअकरा हजार युवक-युवतींना नोकरी दिली आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून याद्वारे अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्यांची कार्यवाही केल्याचे डॉ. सावंत म्हणाले .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसह इतर योजनांच्या महिला लाभार्थ्यांना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश आणि निवड पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पारंपारिक वेशभूषेत आलेल्या सिंधू पवार आणि पूजा पवार या बंजारा समाजातील भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.
प्रारंभी लाडक्या बहिणींचे स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. तसेच काही महिलांनी त्यांच्यासोबत मोबाईलवर सेल्फी घेण्याचा आग्रह केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः महिलांच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून देत आपल्या लाडक्या बहिणींचा मान राखला. मुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री डॉ. सावंत यांनी लाडक्या बहिणींवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ, विठ्ठल मूर्ती, वीणा व घोंगडी देवून यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे कळंब तालुका प्रमुख तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे व इतर कांही गटाच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हास्ते शिंदेच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केले.
या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख, प्रमुख , जाकेर सौदार , सुभाषसिंह सद्दिवाल , आंण्णा जाधव ,दत्ता साळूंके , लटके सर ,जेदेव गोफने , लोकप्रतिनिधी व शिव सैनिक हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .


