धाराशिव - छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करावे - खा राजेनिंबाळकर
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
धाराशिव -बीड - छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित मार्गाचे पुन्हा सर्व्हेक्षण करून काम तत्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.२३ जून रोजी केली आहे.
पुणे येथे मध्य रेल्वे विभागाच्या विभागीय समितीची बैठकीत ते बोलत होते. बैठकीत धाराशिव लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या अनेक प्रश्ना संदर्भात खा. राजेनिंबाळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. रेल्वे प्रवाशांना येणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी खा डॉ सुप्रियाताई सुळे, खा श्रीरंग बारणे, खा अमोल कोल्हे, खा डॉ शिवाजी काळगे, खा निलेश लंके, खा धैर्यशील मोहिते पाटील, खा भाऊसाहेब वाघचौरे, खा विशाल पाटील व रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना आदी उपस्थित होते.
या बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाडा परिसरातील रेल्वे विकास संदर्भात महत्त्वाच्या मागण्या अमृत भारत योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांचा समावेश व विकास बार्शी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश करून स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात यावा. धाराशिव रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा कमी असल्याच्या तक्रारी असून कामांची गुणवत्ता राखण्यासाठी महाप्रबंधक, अधिकारी व ठेकेदार कंपनी यांच्यासह संयुक्त पाहणी दौरा आयोजित करावा अशा सूचना दिल्या. तसेच धाराशिव स्थानकावर कोच इंडिकेटर, ए.टी.एम., लॉकर सुविधा, स्वतंत्र महिला प्रतीक्षालय, आणि दोन बुकींग क्लार्कची नियुक्ती करण्यात यावी. तर या स्थानकाजवळ माल उतरण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म व गुड्स शेड बांधण्यात यावेत. आर.पी.एफ. कर्मचारी संख्येत वाढ करून स्थानकाच्या सुरक्षेचा दर्जा सुधारावा. धाराशिव शहरात स्वतंत्र रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालय सुरू करावे व कर्मचारी संख्या वाढवावी. नवीन रेल्वेमार्ग व दुहेरीकरणासाठी मागण्या धाराशिव - बीड - छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गासाठी बजेट मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे व काम त्वरित सुरू व्हावे. धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वेमार्गाचे काम २०२७ अखेर पूर्ण होईल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच लातूर रोड - कुर्डुवाडी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वे बोर्डाने घेतलेला निर्णय स्पष्ट करण्यात यावा. नांदेड - लातूर रोड नवीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीस गती देण्यात यावी. पंढरपूर - कुईवाडी - परांडा - भूम - वाशी - बीड - जालना - शेगाव या महत्त्वाच्या मार्गाच्या निर्मितीस मान्यता देण्यात यावी. स्थानक आणि थांबे संदर्भातील मागण्या वडगाव (ता. धाराशिव) गावाच्या सरहद्दीत नवीन स्थानकाची मागणी नागरीकांनी केली असून, भविष्यातील एम.आय.डी.सी. मुळे ते महत्त्वाचे ठरणार आहे. नांदेड जंक्शनला मध्य रेल्वेच्या अधिपत्याखाली आणण्यात यावे, ही नागरीकांची मागणी आहे. लातूर रोड –कुर्डुवाडी मार्गावरील दडशिंगे रोड येथे व्हिडाऊट मॅन क्रॉसिंगचे बांधकाम करण्यात यावे. धाराशिव - तुळजापूर - सोलापूर मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून, त्यांच्या पाल्यांना कोकण रेल्वेसारखा नोकरीत आरक्षणाचा विशेष प्रावधान करण्यात यावा. लातूर रोडवरील ढोकी येथे ओव्हर ब्रीजचे बांधकाम तातडीने करावे. स्थानिक पायाभूत सुविधा व अडचणी बार्शी तालुक्यातील ग्राम पुरी येथील यु.बी. (अंडर ब्रीज) मध्ये पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, यासाठी सिमेंट नाल्याचे बांधकाम करावे. ग्राम जहागीरदारवाडी (ता. धाराशिव) येथील यु.बी.ची उंची वाढवावी, कारण सध्या वाहतुकीस अडचण होते. रेल्वे थांब्यांबाबत मागण्या हरंगुळ ते हडपसर मार्ग पूर्वीप्रमाणे सुरु ठेवावा. एल.टी.टी. मुंबई - नांदेड गाडीला धाराशिव व बार्शी येथे थांबा द्यावा. लातूर - मुंबई गाडीला कळंब रोड (कसबे तडवळे) येथे थांबा द्यावा. नांदेड - पनवेल गाडीला ढोकी येथे थांबा द्यावा, आधी मागण्या खा राजेनिंबाळकर यांनी केल्या.
