नळदुर्ग येथील व्यवसाय नगरमधील नागरीकांनी परंडा येथील नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या ग्रस्तांना जिवनावश्यक वस्तुचे किट वाटप करून माणूसकीचे दर्शन घडविल्याने सर्वत्र चर्चा
देशभक्त न्युज - नळदुर्ग / प्रतिनिधी - ( सुहास येडगे )
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक संकटात मदत करण्यासाठी नळदुर्ग येथील व्यासनगर येथील नागरीक सरसावले असुन परंडा तालुक्यातील शिरसाव या गावांतील पुरग्रस्तांना व्यास नगर येथील नागरीकांच्या वतीने किराणा मालाच्या कीटसह इतर जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे. व्यासनगर मधील नागरीकांनी या उपक्रमातुन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
परंडा तालुक्यात आलेल्या महापुराने हजारो नागरीकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या पुरामुळे परंडा तालुक्यातील 29 गावे पार उध्वस्त झाली आहेत. अतिशय विदारक चित्र याठिकाणी निर्माण झाले आहे.येथील नागरीकांना खायला अन्न नाही की प्यायला पाणी नाही. जे होते ते सर्व पाण्यात गेले आहे.त्यामुळे येथील नागरीकांची उपासमार होत आहे. पुरामुळे या लोकांवर ओढावलेले संकट लक्षात घेऊन नळदुर्ग येथील व्यासनगरमधील महिला, पुरुष व युवकांनी एकत्रित येऊन परंडा तालुक्यातील पुरग्रस्तांना मदत पाठविण्याचा निर्णय घेतला त्यांनी शहरातील नागरीकांनाही याबाबतीत मदतीसाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील कांही नागरीकांनीही त्यांना या कामी मदत केले.
व्यास नगर येथील नागरीकांनी सर्व मदत एकत्रित करून त्याचे किट तयार केले. यामध्ये किराणा मालाच्या साहित्याचे किट, फरसाण, बिस्कीट, पाण्याचे बॉटल, चपला, कपडे, साड्या, टुथब्रश, टुथपेस्ट यासह इतर जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे.
दि. 29 सप्टेंबर रोजी भल्या सकाळी ही सर्व मदत घेऊन व्यासनगर येथील संदीप गायकवाड, नितीन कुलकर्णी व इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरग्रसतांना मदत पोहचविण्यासाठी परंडाकडे रवाना झाले. दुपारी 1 वा. परंडा तालुक्यातील पुरामध्ये उध्वस्त झालेल्या शिरसाव या गावात जाऊन तेथील पुरग्रस्त नागरीकांना संदीप गायकवाड, नितीन कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मदत दिली आहे. शिरसाव गावांतील 100 कुटुंबाना किराणा मालाच्या साहित्याचे किट व इतर जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे.व्यासनगर मधील नागरीकांच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.


