कार्डियाक कॅथलॅबसह ५०० बेड सिव्हिल हॉस्पिटलचे काम तात्काळ सुरू करा - आ. कैलस पाटील
देशभक्त न्युज - धाराशिव प्रतिनिधी / -
जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा अद्याप सुरू न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जिल्ह्यात स्थगितीच्या राजकारणामुळे अडकलेले कार्डियाक कॅथलॅब, एमआरआय मशीन आणि ५०० बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे काम तातडीने पूर्ण करून सुरू करावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली.
सभागृहात बोलताना आ कैलास पाटील म्हणाले की, आजकाल केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कार्डियाक कॅथलॅब नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये आरोग्य विभागाने कॅथलॅबसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तर ते काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. ऑक्टोबर २०२४ पर्यंत कॅथलॅब सुरू होणे अपेक्षित असताना अद्याप काम पूर्ण झालेले नाही. दहा बेडचे हॉस्पिटल आणि कार्डियाक कॅथलॅब मंजूर असूनही सुविधा सुरू न झाल्याने गंभीर रुग्णांना सोलापूर येथे हलवावे लागत आहे. मात्र, गोल्डन अवरमध्ये उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आ पाटील यांनी सभागृहात सांगितले.
ट्रान्सफॉर्मर व जनरेटरच्या अडचणीमुळे काम रखडले
कॅथलॅबसाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटरच्या निधीला स्थगिती मिळाल्याने काम अपूर्ण राहिल्याचे त्यांनी नमूद केले. २०२५-२६ मध्ये पुन्हा मंजुरी देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली. तसेच धाराशिवसाठी मंजूर असलेली एमआरआय मशीन सरकार बदलल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, धाराशिवकारांनी आंदोलन आणि त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने एमआरआय मशीन धाराशिवमध्ये ठेवण्यात आली. मात्र, एमआरआयचे काम पूर्ण झाले असून देखील केवळ आयुक्तांच्या सहीअभावी मशीन सुरू झालेली नाही. त्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागत असून लोकांची हेळसांड होत असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात बोलताना सांगितले.
५०० बेड सिव्हिल हॉस्पिटलचे कामही रखडले
धाराशिवमध्ये ५०० बेडचे सिव्हिल हॉस्पिटल मंजूर झाले असले तरी सुरुवातीला निधीची तरतूद नव्हती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक मार्फत निधी मंजूर झाला. मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असून काम तातडीने सुरू केल्यास मोठा दिलासा मिळेल, असे आ. पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले.
